शिंदेवाडीत लोकप्रतिनिधींना गावबंदी ;आरक्षणाच्या समर्थनात कँडल मार्च

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी ता – कागल येथे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी गावपातळीवर बैठक घेऊन लोकप्रतिनिधींना गावबंदी तसेच राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.तसेच गावातून आरक्षणाच्या समर्थनात कँडल मार्च काढण्यात आला.
याबरोबरच सर्वच राजकीय गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसेच स्थानिक राजकीय बॅनरबाजी, डिजिटल फलक व वाढदिवस फलक न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आगामी सर्व निवडणुकींवर बहिष्कारही टाकणार असल्याचेही गावकऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीत विविध गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आरक्षणा संदर्भात भावना व्यक्त केल्या. युवकांचा सहभाग लक्षणीय होता . तसेच मुरगुड येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देत उपोषणात सक्रीय सहभाग घेतला .