मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा आरक्षणासाठी विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी करू ; मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. ही मागणी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या भूमिकेतूनच गेली अनेक वर्षे काम करीत आहे. यापुढेही या भूमिकेतूनच काम करीत राहू, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांची मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंदोलकांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आग्रही मागणी केली.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे. अशी मागणी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडू. सरकारने कायदेतज्ञांचे सल्ले घ्यावेत व कोंडी फोडावी, ही मागणी करणार आहे. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेतूनच गेल्या अनेक वर्षांपासून आजपर्यंत काम करीत आहे. यापुढेही या भूमिकेतूनच काम करू. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत लाखोंचे मोर्चे निघाले, त्यामध्ये सहभागी झालो. तसेच; मराठा आरक्षणासाठीच्या उपोषण आणि आंदोलनामध्येही सहभागी झालो. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या मागणीवर आग्रही राहू, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवू, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे- पाटील यांनी पाणी तरी घ्यावं…..!
मंत्री श्री. म्हणाले मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती आमरण उपोषणामुळे खालावली आहे. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे. समाजाच्या या भावनेचा त्यांनी आदर करावा, अशी विनंतीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केली.