कोल्हापूरमधून 15 अमृत कलश दिल्लीसाठी रवाना ; मेरी माटी मेरा देश – खासदार धनंजय महाडिक यांचे हस्ते कलश पूजन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर : मेरी माटी मेरा देश अंतर्गत जिल्हयातून गावागावातून मातीचे अमृत कलश तयार करून तालुक्यांना व तालुक्यातून जिल्ह्याला असा प्रवास करीत कोल्हापूर मधून एकुण 15 अमृत कलश आता दिल्लीसाठी रवाना झाले. खासदार धनंजय महाडिक यांनी कलश पूजन करून, कलश घेवून जाणा-या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूर महानगरलिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति महापालिका आयुक्त केशव जाधव, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नरेंद्र मुतकेकर, तहसीलदार सुर्यकांत पाटील, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी पूजा सैनी, 30 स्वयंसेवक व 1 समन्वयक उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हयातून 12 तालुक्यांमधून 12 कलश, 13 नगरपालिकांचा एकत्रित केलेला 1 कलश, 2 कलश 2 महानगरपालिकांमधून असे मिळून एकुण 15 अमृत कलश कोल्हापूर येथून मुंबई मार्गे दिल्ली येथे स्वयंसेवकांमार्फत जाणार आहेत. मुंबईच्या आजाद मैदानावर राज्यातील सर्व अमृत कलशांचे 27 ऑक्टोबर रोजी पूजन करण्यात येवून ते दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत.
दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये ‘अमृत कलशच्या माध्यमातून जिल्हयात एकत्र केलेली माती देशासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या सन्मानार्थ दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या ‘अमृत वाटिकेत’ अर्पण केली जाणार आहे.