कोल्हापूर : दंड कमी करण्यासाठी वीज ग्राहकाकडून 36 हजारांची लाच घेताना महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले

अनधिकृतपणे वीज वापर केल्याच्या कारणावरून केलेला दंड कमी करण्यासाठी वीज ग्राहकाकडून 36 हजार रुपयांची लाच घेणार्या महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर (वय 47, रा. खासबाग मैदानजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि सहायक लेखापाल वर्ग 3 रवींद्र बापूसो बिरनाळे (वय 38, रा. आमराई रोड, इचलकरंजी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास स्टेशन रोडवरील महावितरणच्या विभागीय कार्यालयात करण्यात आली.
याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली. शहरातील एका वीज ग्राहकाने व्यवसायासाठी औद्योगिक वीज जोडणी घेतली होती. व्यवसाय बंद झाल्यानंतर तक्रादार याने ही जागा वीज जोडणीसह कराराने भाड्याने दिली होती. तक्रारदार यांनी अनधिकृतपणे वीज वापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना एकूण एक लाख 22 हजार 678 रुपयांच्या दंडाची नोटीस महावितरणच्या वतीने दिली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पाटणकर आणि बिरनाळे यांनी तक्रारदार यांना दंड कमी करून 19 हजार रुपये केला. त्यासाठी तक्रारदार यांच्याकडून दंडाचे 19 हजार व दोघांसाठी 41 हजार अशी एकूण 60 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली.
मंगळवारी दुपारी पाटणकर यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून 19 हजार दंडाचे व लाचेसाठीचे 36 हजार असे 55 हजारांची रक्कम घेताना बिरनाळे यास रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, संजीव बंबरगेकर, उपनिरीक्षक विकास माने, पो.कॉ. मयूर देसाई, रूपेश माने, विष्णू गुरव आदींनी केली.