३१ वर्षानी ते भेटले अन जुन्या आठवणींचा बांध फुटला ; मुरगूड विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
३१ वर्षांनी ते एकत्र आले, त्यांनी एकमेकाला पाहिले, कोणी हस्तान्दोलनाने तर कोणी चक्क गळा भेटीने आनंद व्यक्त केला.प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या मित्र मैत्रिणींच्या मग जुन्या आठवणींचा जणू बांधच फुटला.शालेय जीवनातील केलेल्या खोड्या, शाळेला मारलेली दांडी, त्या बद्दल मिळालेली शिक्षा, मित्राची उडवलेली टर तर शिक्षकांची केलेली फजिती या अशा असंख्य रम्य आठवणीत मग रंगून गेले सभागृह. सर्वानीच एक समान मानसिक पातळीवर अनुभवला एक आनंदमयी सोहळा … !
हे दृश्य होते मुरगूड (ता.कागल ) येथील मुरगूड विद्यालयाच्या सन १९१-९२ सालच्या दहावीच्या च्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. मुरगूड मध्ये पार पडलेल्या या स्नेह मेळाव्यात कागल मुरगूड राधानगरी निपाणी भूदरगड कोल्हापूर बंगलोर मुंबई पनवेल डोंबिवली पुणे सातारा भागातील सुमारे १०० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
माध्यमिक शिक्षणानंतर विविध पदावर कार्यरत असणारे रथी महारथी आज एकत्र आले होते. यातील काहीजण उच्च शिक्षण घेऊन मोठं मोठ्या कंपनीत कार्यरत होते तर काहीजण उच्च शिक्षणा पासून वंचित काहीजण मात्र गावाकडच्या शेतीतच कार्यरत राहून सांसारिक जीवन आनंदाने जगत होते.या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शासकीय निमशासकीय क्षेत्रा सह नागरी ग्रामीण जीवनातील सर्व चढ उतार प्रत्येक जण एकमेकाला सांगत होता.यातून प्रत्येकाला एक विलक्षण व अविस्मरणीय अशी अनुभूती मिळत होती.
स्वागत प्रास्ताविक नितीन पोतदार यांनी केले.नंदू बेळेकर यांनी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुभाष कांबळे,दत्तात्रय माने,विद्या फर्नांडिस यांनी केले. प्रा.चंद्रशेखर कांबळे,बाळासाहेब पाटील,राहुल शिंदे,अमित भोई,रामचंद्र पुजारी,नवीन बारड,सचिन कुंभार,अमर चौगले,राजू व्हनबट्टे, केतकी वखारिया,आरती कासार,अरुणा गंगापूरे,श्वेता खैरे आदींनी मनोगत व्यक्त केले.तर एकनाथ आंगज,निवास कांबळे,पवन लाड,शशिकांत गोधडे यांनी विविध कला सादर केल्या.