ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार

पुणे टीम ऑनलाईन :

तमाम महाराष्ट्रवासियांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होणार आहे; तसेच येत्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतही पावसाच्या सरी बरसणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो एक जूनला केरळमध्ये येतो. यंदा मात्र तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याने महाराष्ट्रातही तो वेळेआधी पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र, आपल्या लहरी स्वभावाची चुणूक त्याने दाखवून दिली आणि त्याची पावले मंद पडू लागली. महाराष्ट्राच्या सीमेवर तो सुमारे आठवडाभर थांबला. त्यामुळे आणखी काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत असतानाच त्याने पुन्हा सर्वांना झुकांडी दिली आणि त्यामुळे येत्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे पुणे वेधशाळेने गुरुवारी जाहीर केले.

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसांत संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा काही भागांत तो धडक मारणार आहे. मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्याने राज्यात मान्सूनपूर्व सरीही जोरदार बरसण्यास सुरूवात होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण असेल, तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks