30 हजार रुपये लाच घेताना नगररचना विभागातील लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

घर व प्लॉट अकृषक करून देण्यासाठी 30 हजार रुपये घेतल्यानंतर आणखी 50 हजार रुपये मागणाऱ्या नगर परिषदेतील नगररचना विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. गोंदिया एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.21) केली. अब्दुल सलाम वल्द हबीब कुरेशी (वय- 51, रा. नुरी मस्जीदच्या मागे, सिव्हिल लाइन) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
याबाबत गोंदिया येथील 31 वर्षाच्या व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्या आई व बहिणीच्या नावाने नगर परिषद हद्दीतील घराची अकृषक वापराची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द झाली आहे. यावर आरोपी कुरेशी याने घर प्लॉटची गुंठेवारी (NA) करून देण्यासाठी 80 हजार रुपयांची मागणी केली. यापैकी 30 हजार रुपये घेतले व उर्वरित 50 हजार रुपयांची मागणी करीत होता.
यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता कुरेशी याने 30 हजार रुपये घेतल्याचे स्वीकार करून आणखी 50 हजार रुपयांची मागणी पंचांसमक्ष केली. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल तवाडे, विजय खोब्रागडे, हवालदार संजय बोहरे, संतोष शेंडे,अशोक कापसे, कैलास काटकर, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, चालक दीपक बतबर्वे यांनी केली आहे.