ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्री : गाय दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळच्या ‘बोरवडे’ शीतकरण केंद्राची तोडफोड

गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी संघाच्या बोरवडे ( ता. कागल ) येथील शीतकरण केंद्राची मोडतोड केली. यावेळी आंदोलकांनी खिडकीच्या काचा फोडल्या तर शाखाप्रमुखांच्या टेबलाची तोडफोड केली. शिवाय झेंड्याच्या काठीने मारहाण केल्याने गोकूळचे तीन कर्मचारी जखमी झाले. याबाबत शाखाप्रमुख विजय कदम यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यात गाय दूध दरात दोन रुपयांची कपात केली आहे. ही दरकपात रद्द करुन गाय दूधदर पूर्ववत करावा या मागणीसाठी मनसेचे १० ते १५ कार्यकर्त सकाळी ९.३० च्या दरम्यान संघाच्या बोरवडे शीतकरण केंद्रावर आले होते. यावेळी संकलन सुरु असल्याने शाखाप्रमुख विजय कदम यांनी त्यांना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावले. दरम्यान चर्चा सुरु असतानाच अचानकपणे कार्यकर्त्यांनी खोलीच्या खिडकीच्या काचा फोडल्या. शाखाप्रमुखांच्या टेबलाचीही काच फोडून त्याची मोडतोड केली. या फुटलेल्या काचा उडून उपस्थित कर्मचार्‍यांना लागल्याने ते जखमी झाले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन कर्मचार्‍यांनाही झेंड्याच्या काठीने मारहाण करत जखमी केले. मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबतची तक्रार शाखाप्रमुख विजय कदम यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोले, संचालक आर. के. मोरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवून माहिती घेतली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks