60 हजार रुपये लाच घेताना महिला सरपंचासह वसुली कारकून अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ना हरकत पत्र देण्यासाठी 60 हजार रुपये लाच स्वीकारताना पालघर तालुक्यातील पाम ग्रामपंचायतच्या महिला सरपंचासह वसुली कारकून याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.12) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास केली. दोघांवर लाचलुचपत प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे (रा. सोळंकी कॉम्प्लेक्स सी-2 फ्लॅट नंबर 1 व 2 रूप-रजत नगर, बोईसर (प) ता.पालघर जि. पालघर), वसुली कारकून भावेश गणपत पिंपळे (वय 44 रा.पाम ता. व जि.पालघर) असे लाच घेताना पडकण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 38 वर्षाच्या व्यक्तीने पालघर एसीबीकडे 10 ऑक्टोबर रोजी तक्रार केली आहे.
तक्रारदार यांचा खाजगी सेक्युरिटी सर्विसेस चा व्यवसाय आहे.या व्यवसायासाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला त्यांना पाहिजे होता.त्यासाठी त्यांनी पाम ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणत्र देण्यासाठी सरपंच दर्शना पिंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 60 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सरपंच दर्शना पिंगळे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारा ना हरकत दाखला देण्यासाठी 60 हजार रुपये लाचा मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम ग्रामपंचायतचा वसुली कारकून भावेश पिंगळे यांच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने सापळा रचून भावेश पिंगळे याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कामगिरी ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे , अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस अधीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे,पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी पोलीस अंमलदार अमित चव्हाण, दीपक सुमाडा, नवनाथ भगत, विलास भोये,नितीन पागधरे, निशिगंधा मांजरेकर, स्वाती तारवी आणि जितेंद्र गवळी यांच्या पथकाने केली