महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारुन पळवणारा संशयीत चोरट्यास मुरगूड पोलीसाकडून अटक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी ता. कागल येथे धुणे धुण्यास गेलेल्या महिलेच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे जिन्नस हिसकावून घेवून पळालेल्या चोरट्यास मुरगूड पोलीसांनी अवघ्या एक तासात अटक केली आहे.
महिलांना रस्त्यावर एकट्या गाठून जबरी चोरीच्या सोनाळीतील घटनेनंतर एका तासात सराईत चोरट्याला मुरगूड पोलीसांनी अटक केली. महिलांना लुबाडण्याचे गुन्हे या चोरट्याने कबूल केले.
सुरेश बळवंत म्हातुगडे (वय ३६ रा. सावर्डे बुद्रुक ता. कागल) असे त्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सोनाळी, ता कागल येथील सलोनी संतोष भोसले निढोरी रोडवरील ओढ्याच्या पाण्यात कपडे धुत असताना तिच्या कानातील दागिन्याला हिसडा मारला. त्यामुळे फिर्यादीचे दोन्ही कान फाटले.
त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले व चोरटा पळून गेला. त्याच्याकडे सोन्याची कर्णफुले व साखळी मिळून आली. तसेच सोनाळी, चंद्रे व शंडूर येथे चोरलेले दागिने मिळून आले. त्याला १० पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.