ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा १६ जणांना चावा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहरासह यमगे, शिंदेवाडी येथील सुमारे पंधरा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुरगूड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी रात्री पाच ते सहा जणांचा चावा घेतला. त्यामध्ये २५ ते ३० वयोगटातील दोन युवकांचाही समावेश होता.
त्यानंतर या कुत्र्याने शिंदेवाडी येथील दोघांचा चावा घेतला. तेथून त्याने आपला मोर्चा यमगे येथे वळवला. याठिकाणी देखील या कुत्र्याने एका महिलेसह ८ जणांचा चावा घेतला. दरम्यान, कुत्र्याने चावा घेतलेल्या ४ जणांवर मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर उर्वरीत १२ जणांना कोल्हापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.