मोठी बातमी : अजित पवार गटाला मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राज्यासह केंद्रात दिली जाणार 3 राज्यमंत्रिपदे

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस-पवार यांचे महायुती सरकार कारभार सांभाळत आहेत. सुरुवातीला शिंदे आणि फडणवीस यांनी हातमिळवणी करत सत्तेचे चित्र पालटले. यानंतर अजित पवारांनी देखील महायुती सरकारमध्ये सहभागी होत सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. दोन महिन्यांनंतर देखील अजित पवारांच्या या बंडाची चर्चा होत असते. अजित पवार सत्तेमध्ये सामील होण्यापासून ते आत्तापर्यंत या आघाडीमध्ये अजित पवारांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा घटस्थापनेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळी देखील अजित पवारांच्या ‘पॉवर’ची प्रचिती येणार असून विस्तार करण्यात येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये देखील अजित पवार गटाला मंत्रीपदे मिळणार आहे. एका वाहिनीने केलेल्या दाव्यानुसार, यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अशी भरघोस पदे देण्यात येणार आहे.
अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे दुसऱ्याच मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाच्या 9 आमदारांना मंत्री पदे देण्यात आली. यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. आता पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तार होणार असून यावेळी देखील अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या विस्तारामध्ये अजित पवार गटाची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. सत्तेत सहभागी होतानाच अजित पवार यांना याबद्दल आश्वासन दिले असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेनंतर देखील रखडल्यास अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
महायुती सरकारमध्ये असणाऱ्या अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते. त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. नाराजीनंतर अजित पवारांच्या तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
आता मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये देखील अजित पवार गटाचाच प्रभाव दिसून येणार आहे.
यंदाच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद दिले जाणार आहे.
महायुती सरकारच्या स्थापनेवेळी शिंदे गटाला मुख्यमंत्री पद देण्यात आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.मात्र भाजपाकडे महत्त्वाची मंत्रीपदे देण्यात आली होती. या सरकार स्थापनेनंतर शिंदे गटाच्या अनेक आमदारांना मंत्री होण्याची आशा लागून राहिली होती. मंत्री मंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना मंत्री पदे मिळतील अशी अपेक्षा होती मात्र अजित पवार यांनी सत्तेमध्ये सहभागी होत शिंदे गटाची स्वप्ने मोडली.अजित पवार सत्तेमध्ये सामील होण्यापासून ते आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदे अजित पवार गटाला देण्यात आली आहे.त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असून महाविकास आघाडीमध्ये बरे चालू असताना इकडे आल्यानंतर कोणतीच पदे दिली जात नसल्याने हा नाराजीचा सूर आणखी वाढत आहे.