ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुक्रवारी दसऱ्या दिवशीही केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू : डॉ. ए. बी. माने ठेवी स्वीकारण्यासाठी सुरू राहणार कामकाज

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा शुक्रवारी दि. १५ रोजी दसऱ्याच्या सणादिवशीही सुरू राहणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी.  माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

केडीसीसी बँकेने अलीकडेच साडेसात हजार कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे नऊ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे. तसेच बँकेचा संयुक्त व्यवसायाचा आलेखही १५ हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे. बँकेच्या ठेवीदारांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या नजीकच्या शाखेमध्ये जाऊन ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही डॉ. श्री. माने यांनी केले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे, गेली दोन वर्ष सुरू असलेल्या कोविड  संसर्गाच्या महामारीतसुद्धा बँकेने शेतकऱ्याला विनाविलंब पिककर्ज पुरवठा व मध्यम मुदत कर्ज पुरवठा करून शेतीच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच सरकारने दिलेल्या पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करीत या बँकेने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर अनुषंगिक गरजांसाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठाही केला आहे. तसेच; बँकेने बचत गटांनाही प्रसंगी नियमात शिथिलता आणून अर्थपुरवठा केला आहे. कोविड संसर्गाच्या काळात ग्राहकाला घरातूनच व्यवहार करता यावेत यासाठी केडीसी बँकेने ‘केडीसीसी मोबाईल बँकिंग’ व ‘केडीसीसी बँक ऑन व्हील्स’ ही गावोगावी अद्ययावत सुविधा सुरू केली. बँकेच्या शाखा नसलेल्या गावातून उभारलेल्या मायक्रो एटीएम सेंटर्सनाही ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच दूध वितरकांचा दूध बिल भरणा सुट्टी न घेता स्वीकारला जातो, हेही या बँकेचे वैशिष्ट्य आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks