पोलीस पाटलांच्या समस्या सोडवा : आजरा पोलीस पाटील संघटनेेेची मागणी

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
महाराष्ट्र राज्यात एकूण 38 हजार पोलीस पाटील सध्या कार्यरत असून शिवकालीन इतिहासापासून या पदाला महत्त्व आहे गावचा संपूर्ण गाव गाडा हाकत असताना महसूल व गृह विभाग या दोन्ही विभागाच्या जबाबदाऱ्या आजवर पोलीस पाटील पेलत आला आहे पूर्वी परंपरागत असलेले हे पद आत्ता आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा यामुळे विविध समाजातील तसेच उच्चशिक्षित पोलीस पाटील या क्षेत्रात आले आहेत.
अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना कुटुंब सांभाळणे सुद्धा पोलिस पाटील यांना हलाखीचे झाले आहे. मानधन कमी,काम जास्त त्यातच वेळेत मानधन नाही,प्रवास खर्च सरासरी महिना 250 रुपये प्रमाणे तर स्टेशनरी व इतर खर्च स्वतः पदर ने करावा लागतो आज इतर मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट झाले असताना पोलीस पाटील यांना मात्र कोणीच वाली उरलेला नाही अशी परिस्थिती आहे.गाव व शासन यांच्यातील पोलीस पाटील दुवा असलेने त्यांना गावाबाहेर इतर कोणतेही काम करता येत नाही व त्यामुळे त्यांच्यावर कुटुंब चालवायचं कसं हा प्रश्न उभा आहे.कोतवाल, अंगणवाडी सेविका यांचे मानधनात भरघोस वाढ झालेली असताना शासन पोलिस पाटील यांच्या बाबतीत उदासीन का आहे ? असा प्रश्न तळागाळातील पोलिस पाटील यांना पडला आहे.
गावातील तंटे गावातच सोडविणे ,गुन्हेगारीवर लक्ष ठेवून त्याची गुप्त माहिती पोलिस प्रशासनाला देऊन कायदा व सुव्यवस्था राखणे, कामी मदत करणे तसेच महसूल गौण खनिज उत्खनन, निवडणुक,मतदार नोंदणी ,पीक पाहणी, पी.एम. किसान,आपत्कालीन सेवा अश्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेत पोलिस पाटील यांचे मोलाचं सहकार्य असते.असे असताना शासन स्तरावरील वेगवेगळ्या योजनांपासून पोलिस पाटील मात्र वंचित च राहतो,पोलिस पाटील कल्याण निधी ची घोषणा फक्त घोषणाच ठरली तिची अजुन पर्यंत कोणतीही अमल बजावणी झालेली नाही. निवृत्ती वेतन नाही अथवा विमा संरक्षण नाही.या सर्व गोष्टीपासून आमचा पोलिस पाटील आजपर्यंत उपेक्षितच आहे.
म्हणूनच आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या इतिहासकालीन महत्त्व असलेल्या व तळागाळातील शासनाच्या शेवटच्या घटकास (पदास) कालबाह्य होण्यापासून वाचवण्यास मदत करू शकता.वेळोवेळी मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच महसूल मंत्री या सर्वांना निवेदन देऊनही ही परिस्थिती जैसे थे आहे त्यामुळे सरकारने पोलीस पाटलांच्या या समस्यांचे निराकरण करावे. अशी मागणी आजरा तालुका पोलीस पाटील संघटनेने केली आहे.