गडहिंग्लज शहरातील विविध विकासकामांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आढावा ; नगरपरिषदेच्या विकासासाठी व शहराच्या सौंदर्यीकरणासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील पहिल्याच दौऱ्यात गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विकास व सौंदर्यीकरण यावर भर देण्याच्या सूचना केल्या व त्या अनुषंगाने आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगर परिषदांना दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून करावयाच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी मुख्याधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांना मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचनाही दिल्या. या बैठकीला मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी विविध कामांची माहिती सादर केली. प्रांत बाळासो वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचेसह नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी शहरातील पाणीपुरवठा योजना राबवीत असताना रस्ता कॉंक्रिटीकरण पूर्ण होण्याआधी योजना राबवा, शहरांतर्गत होणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करा, महत्वाच्या ठिकाणी हायमास्ट लाईट सुविधा उभारताना त्यासाठी सोलर योजनेचा वापर करा अशा सूचना दिल्या. गडहिंग्लज शहरातील मुख्य रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग होत आहे महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशा वेळी शहराच्या बाहेरून जाणारा रिंग रोड विकसित होणे आवश्यक आहे सदर रिंग रोड विकसित करणे व भूसंपादन करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे त्याबाबत ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यापूर्वी नियोजित रिंग रोड मंजूर होता त्यामध्ये काही अंशी बदल करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने लोकांचे सूचना घेऊन योग्य प्रकारे रिंग रोडची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे येथे राज्यस्तरावर बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कामामधे सर्वसामान्य लोकांची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन व इतर कामांची तुटफूट होत आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेस लोकांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई करून किंवा सदर कामे दुरुस्त करून देण्याचे निर्देश दिले. तसेच शहराचा विकासा आराखडा तयार करत असताना तयार केलेल्या सिटीसर्वे मधील अतिक्रमणधारकांबाबत तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.