निपाणी : विश्व हिंदू परिषद ,राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ व सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम मंदिर अक्षता कलशाची शोभायात्रा उत्साहात

अयोध्या येथून निपाणीत आलेल्या ती रामलला मंदिर अक्षता कलशांची भव्य शोभायात्रा आज अभूतपूर्व उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडली.प्रथम रामभक्त भगिनींनी या अक्षतांचा एक मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठविण्यासाठी 800 मंगल कलशांची बांधणी व सजावट रामस्मरणात केली.
सायंकाळी पाच वाजता पूज्य सच्चिदानंद स्वामी (तमनाकवाडा), पूज्य ईश्वरानंद स्वामी (हंचनाळ), पूज्य प्राणलिंग स्वामी (समाधी मठ), श्री श्री श्री आनंद तीर्थ स्वामी (ओम शक्ति मठ, शेंडुर), श्री बसव मल्लिकार्जुन स्वामी (दानम्मादेवी मठ),जोतीशास्त्र शाहीस्वामी बडजी (इचलकरंजी) यांच्या दिव्य सानिध्यात मंत्रोच्चाराच्या भक्तिमय वातावरणात कलश पूजन झाले.
त्यानंतर आरती व रामनामाचा जयघोष यांनी परिसर दुमदुमून गेला.आमदार शशिकला जोल्ले वहिनी विश्व हिंदू परिषद चे जिल्हा मंत्री सुजित कांबळे श्रीराम मंदीर अभियान संपर्क प्रमुख सुचित्रा ताई कुलकर्णी,उदय यरनाळकर व नगरसेवकांनी आरती व कलश पूजनात सहभाग घेतला.विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांचा हस्ते सर्व संत, महंत व अतिथींचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष प.पू .प्राणलिंग स्वामीजी यांनी श्रीराम मंदीर यांचा माहिती सांगते वेळी म्हणाले की श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलन हे जगभरातल्या कुठल्याही श्रद्धास्थानाकरिता चालणाऱ्या दीर्घतम आंदोलनांपैकी एक आंदोलन आहे. जवळजवळ पाच शतकं चाललेल्या या आंदोलनाने हिंदू जनमानसावर प्रचंड परिणाम केला, सकारात्मक परिणाम केला आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की, हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचं हे आध्यात्मिक आंदोलन आहे. केवळ हिंदू समाजाचा मानभंग करण्याकरिता मुस्लीम विदेशी आक्रमकांनी श्रीराम मंदिराचा नाश केला, आणि हिंदूंना अपमानीत करण्याकरिताच श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी बाबरी ढाचा उभा केला.
तसेच हिंदू समाजाच्या या निरंतर संघर्षामुळे मशिदीचं बांधकाम मुसलमान कधीही पूर्ण करू शकले नाहीत . या पाच शताब्दींच्या अत्यंत भीषण अशा संघर्षामध्ये लाखो रामभक्तांनी आपलं बलिदान दिलं. आणि म्हणून हे जे एक अपमानाचं प्रतीक श्रीराम जन्मभूमी वर होतं, त्याला नष्ट करणे म्हणजेच स्वाभिमानाच्या प्रतीकाची पुनर्स्थापना करण्याकरिता त्या ठिकाणी पुन्हा श्रीराम मंदिर बांधणे हा हेतू घेऊनच हे सर्व आंदोलन एवढ्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे.
राममंदिराच्या निर्माणातून तयार होईल की, रामरायांचं मंदिर भावी रामराज्याच्या संकल्पनेलासुद्धा दृढ करणारं राहील. म्हणूनच श्रीराममंदिर हीच राष्ट्रमंदिराची मुहूर्तमेढ आहे. हे हिंदूराष्ट्र अनादिकालापासून अस्तित्वात आहे. ते प्रबल आणि शक्तिमान होऊन विश्वकल्याणाकरिता विश्वगुरू म्हणून भारताची भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आपण राममंदिराकडे पाहू शकतो.असे मत यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यक्त केले.
आजच्या या दिव्य सोहळ्यात वारकरी सांप्रदाय उत्साहाने सहभागी झाला. ह.भ.प. कावळे महाराज,कापसे महाराज, ह.भ.प. नवनाथ घाटगे महाराज,राजू पोतदार महाराज, शंकर हिरेमठ, ह भ प बाबुराव महाजन (वारकरी महामंडळ) इत्यादी संत सज्जनांनी हरिनामाच्या गजराज शोभायात्रेची भव्यता वाढविली. शोभा यात्रेची सुरुवात श्रीराम मंदिर येथून झाली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तारळे यांनी कलश हार अर्पण केले . प्रथम श्रीराम मंदिर ते साखरवाडी, चन्नम्मा सर्कल पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्व नागरिक व व्यावसायिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.कोठीवाले कॉर्नर परिसरात ट्रबलर्स ग्रुप व स्वस्तिक ट्रेडर्सच्या वतीने मार्गात रांगोळी काढून आतिषबाजी व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर महादेव गल्ली, महादेव मंदिर येथे गांधी चौक,कोठीवाले कॉर्नर, येथे ही स्वागत करण्यात आले . त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना वंदन करून श्री राम मंदिर येथे शोभा यात्रेची सांगता झाली. सर्व सहभागी भक्तांसाठी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथे प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ आणि बजरंग दलाने व राम भक्तांनी यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतेले यावेळी निपाणी व ग्रामीण भागातून तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.