समाजात चांगले बदल घडवण्यासाठी महिलांनी सत्ता व पदाचा वापर करावा : नवोदिता घाटगे ; व्हन्नूरमध्ये दौलतराव निकम जन्मशताब्दीनिमित्त नारीशक्तीचा सन्मान

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सरपंच व पोलीस पाटील महिलांना सत्ता व पदाच्या माध्यमातून अधिकार मिळाले आहेत. त्यांनी त्याचा वापर समाजात चांगले बदल घडवण्यासाठी करावा. असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.
व्हन्नूर ता. कागल येथे तालुक्यातील महिला सरपंच व महिला पोलीस पाटील यांचा सत्कार व महिला मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार दौलतरावजी निकम यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दौलतराव निकम विद्यालय येथे तालुक्यातील पन्नास सरपंच व वीस पोलीस पाटील महिलांचा सत्कार यावेळी केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे यांनी केले. यावेळी महिलांसाठी पारंपरिक स्पर्धांचे आयोजन केले होते.
नवोदिता घाटगे पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यसैनिक निकम यांनी स्वतःचे आयुष्य समाजासाठी समर्पित केले. साधी राहणी व उच्च विचारसरणीच्या निकम यांचे विचार त्यांच्या पश्चातही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त महिला पदाधिकाऱ्यांच्या सत्कारातून नारीशक्तीचा सन्मानच केला आहे.
सुयशा घाटगे म्हणाल्या, प्रत्येक स्त्री कर्तुत्वान असते.तिला फक्त वाव देण्याची गरज आहे. घरातील पुरुषांबरोबर महिलांनी महिलांच्या कर्तुत्वाला पाठबळ देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे आता विधानसभा व लोकसभेत महिलांना आरक्षण मिळणार आहे. हा महिला शक्तीचा गौरव आहे.यावेळी अस्मिता पोवार,रुपाली पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर सुनंदा निकम,यशवंतराव निकम,मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार,सरपंच पुजा मोरे,पोलिस पाटील आश्विनी माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वागत मंगल खोत यांनी केले.सुत्रसंचलन राजश्री इंगवले यांनी केले.आभार आश्विनी पोवार यांनी मानले.
निकम यांना कृतीतून आदरांजली …..!
स्व.दौलतराव निकम हे सच्चे देशभक्त होते. ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर महिलांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या या शिकवणीनुसार आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यांनी प्रशालारुपी लावलेल्या रोपट्याचे त्यांच्या पश्चात वटवृक्षात रूपांतर झाले आहे.ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थी देश-परदेशात चांगल्या पदावर काम करीत आहेत. हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. असे प्रतिपादन यावेळी मंगल मोरे यांनी केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानिशी दाद दिली.