ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिशन कवचकुंडल अंतर्गत जिल्ह्याचे 13 ऑक्टोबर पर्यंत 95 टक्के लसीकरण पूर्ण झाले पाहिजे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापुर, प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली जात असून आज रोजी पर्यंत पहिला डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण 80 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण 40 टक्के इतके आहे. तरी हे प्रमाण मिशन कवचकुंडल अंतर्गत दिनांक 13 ऑक्टोबर 2021 पर्यंत 95 पर्यंत गेले पाहिजे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-19 लसीकरण नियोजनाचा आढावा व जिल्हा कृतीदल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉ. फारुक देसाई, डॉ. विकास देशमुख, शिक्षणाधिकारी(प्रा.) आशा उबाळे, मनपा आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरणासाठी मिशन कवचकुंडल राबवले जात आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील किमान 95 टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने लसीकरण न झालेल्या प्रत्येक गावातील नागरिकांची नावासह यादी तयार करावी व त्यातील लहान व मध्यम गावातील लोकांचे लसीकरण दिनांक 10 व 11 ऑक्टोबर रोजी 100% करून घ्यावे. तर मोठ्या गावातील लसीकरण न झालेल्या लोकांचे लसीकरणासाठी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मोहीम राबवावी. उपरोक्त दोन्ही प्रकारच्या गावातील लोके लसीकरणाच्या दिवशी बाहेर गावी गेले असतील तर ते नागरिक त्या दिवशी परत येईपर्यंत म्हणजेच रात्री सुद्धा त्या गावांमधील एक लसीकरण केंद्र सुरू ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले.

सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. तसेच प्रत्येक गावातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, शिक्षक, आशा वर्कर्स, आरोग्यसेविका व ग्रामपंचायत सदस्य यांची मदत घेऊन त्या त्या गावातील 100% लसीकरण पूर्ण करून घेण्याची सुचना श्री रेखावार यांनी केली. ज्या अल्पसंख्याक समाजातील लोक लसीकरणास विरोध करत असतील तर त्या भागातील त्या समाजातील धर्मगुरूंना सांगावे व त्यांच्या मार्फत लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने लस व सिरिंज चा साठा तालुका स्तरावर उपलब्ध करून द्यावा. शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी या तालुक्याने तसेच कोल्हापूर महानगरपालिकेने या मोहिमेत अधिक सक्रिय पद्धतीने काम करून लसीकरण मोहीम यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी मिशन कवच-कुंडल ची माहिती देऊन जिल्ह्याचे 100% लसीकरण करण्यासाठी सर्व यंत्रणानी कशा पद्धतीने काम करावे याची माहिती दिली तर या मोहिमेत दररोज 80 हजार लसीकरण झाले पाहिजे, असे सांगून चांगले काम करणाऱ्या जिल्ह्याचा राज्य स्तरावर गौरव करण्यात येणार असून, कोल्हापूर जिल्ह्याने आज पर्यंत लसीकरणात चांगले काम केले असून या मोहिमेत अधिक चांगले काम करून राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. पावरा यांनी कोल्हापूर शहरात पहिला डोस घेतलेले 64 टक्के नागरिक असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 48 टक्के असल्याची माहिती दिली.यावेळी डॉ. फारुक देसाई व डॉ. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.

तालुकानिहाय लसीकरण काम कमी असणारी गावे:-

1) भुदरगड- अणफ बुद्रुक, देऊळवाडी शिवडाव
2) चंदगड:- केळेवाडी, दिंडाळकोप व चंदगड
3) गगनबावडा:- मांडकुली, तिसंगी व गगनबावडा
4) पन्हाळा;- तळेवाडी, वारनुर व गोगवे
5) हातकणंगले:- इचलकरंजी, टोप, जुने पारगाव
6) शाहूवाडी:- कोतोळी धनगरवाडा, पुसळे धनगरवाडा व करंजफेन
7) कागल: मळगे बु, करंजविणे व कुरुकली
8) शिरोळ:- आलास, बस्तवाड हत्तवाढ
9) राधानगरी: राजापूर आडोली नागदेवाडी
10) आजरा:- आजरा, बहिरेवाडी बेलेवाडी
11) गडहिंग्लज:- महागाव
12) करवीर:- कोगेखुर्द, गोकुळ शिरगाव व गणेशवाडी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks