पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना हृदयविकाराचा झटका, पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू

पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एका पोलीस हवालदाराचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. सोमनाथ गोडसे असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते शनिवारी (दि.30 सप्टेंबर) रात्री डोंगरी येथील वाडीबंदर परिसरात गस्त घालत होते. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार सोमनाथ गोडसे हे डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी रात्री पी डिमेलो रोडवर पोलीस मोबाईल 3 वर त्यांची रात्रपाळी होती. कर्तव्यावर असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर पोलिसांनी त्यांना जे.जे. रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी गोडसे यांना तपासून मृत घोषित केले. गोडसे हे 1999 साली पोलीस दलात भरती झाले होते. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडसे शनिवारी रात्रपाळीसाठी डोंगरी पोलीस ठाण्यात आले. ते डोंगरी-3 मोबाईल वाहन मध्ये कार्यरत होते. त्यांच्यासह पोलीस हवालदार देसले हे देखील याच वाहनात कार्यरत होते. वाहन वाडीबंदर येथील गोदी परिसरात गस्त घालत असताना गोडसे यांना अस्वस्थ वाटू लागले.
त्यानंतर गोडसेंना वाहनातच चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. देसले यांनी तात्काळ याबाबत दूरध्वनी करुन माहिती दिली. त्यानंतर मोबाईल-1 वाहनाने गोसडे यांना जे. जे. रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन मध्यरात्री 12 च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.