नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाकाबंदी वेळी कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे शुक्रवारी (दि. 29) उपचारादरम्यान निधन झाले रामराव गोविंदराव पाटील (वय-55 रा. डोंगरसोनी ता. तासगाव) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रामराव पाटील हे श्रेणी उपनिरीक्षक होते. ही घटना मिरज तालुक्यातील अंकली येथे 15 दिवसांपूर्वी घडली होती.
14 स्पटेंबर रोजी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अंकली फाटा येथे नाकाबंदी केली होती. त्यावेळी रामराव पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी हे वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजकडून एक कार (एमएच 47 बीजे 4693) भरधाव वेगात आली. पोलिसांनी कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्यातच या चौकामध्ये असलेले वळण कार चालकाच्या लक्षात आले नाही. त्याने रस्त्यावर उभा असलेल्या रामराव पाटील यांना जोरात धडक दिली.
या धडकेत पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना नाकाबंदीवर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले.रामराव पाटील यांच्यावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.