भुदरगड तालुक्यातील परिसरात सागवान वनसंपदेचा अळ्यांनी पाडला फडशा

भुदरगड प्रतिनिधी :
सद्य स्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये जंगलातील हिरव्यागार वनस्पतीच्या पट्ट्यामध्ये अलीकडे एक तांबूस आणि पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसून येत आहे. यामध्ये जवळून जर पाहिलंत तर सागवान वनस्पतीवर विशिष्ट अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आणि हे प्रस्थ फार प्रचंड वाढलेले आहे.
याकडे जर चिकित्सक नजरेने पाहिलं तर जंगलातील संपूर्ण सागवान वनस्पतीची पाने भर पावसाळ्यात पांढरी व तांबूस रंगाची झालेली असुन ती गळण्याचे प्रमाण जास्त आहे. याचा त्या झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार असून सागवान वनस्पती धोक्यात येणार आहे.
रस्त्यावर अशा आळ्या लाखोच्या संख्येने मरण पावलेल्या दिसतात तर झाडांच्या पानांमधून त्याखाली विशिष्ट अशा तंतुमय धागा तयार करून खाली लोंबकळत आहेत हा एक झाडांना चढलेला रोग आहे वनसंपत्तीची निगा राखणे काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे.
या आजाराकडे महाराष्ट्र वन विभागाने तात्काळ तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे .याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर सागवान सारखी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वनस्पती धोक्यात येऊ शकते आणि पर्यावरणीय साखळीमध्ये जैवविविधतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. तरी संबंधित झाड रोगावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या संदर्भात पर्यावरणवादी डॉक्टर विजय शिंदे म्हणाले अशाप्रकारे एखाद्या विशिष्ट अशा झाडावर आळ्यांचा प्रादुर्भाव होणे हा वृक्षांना जडणारा रोग आहे, वृक्ष हे मानवी साखळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या भोवतालच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होणे हे मानवी साखळीसाठी जीव संहितेसाठी धोकादायक आहे.
या आळ्या सागवान वृक्षाच्या पानातील हरितद्रव्य शोषून घेतात व त्यांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ठप्प करतात याचे त्या झाडावर अनिष्ट परिणाम होतात त्यावर वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहेत असे मत व्यक्त केले.