हातकणंगले : पट्टणकोडोलीत तुळजाभवानी मंदिरात चोरी ; मंदिराची दानपेटी फोडत दीड लाखांवर ऐवज लंपास

कोल्हापुरात बाप्पांचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीत तुळजाभवानी मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिरातून देवीचे दागिने, किरीट, छत्र तसेच दानपेटीतील रक्कमेची चोरी झाली आहे. सदर घटना पहाटे पुजारी दळवी यांच्या निदर्शनास आली. माहिती कळताच हुपरी पोलिस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
गेल्या काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील संभाजीनगरमध्ये गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. यानंतर पोलिसांनी याबाबतचा तपास देखील सुरू केला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पट्टणकोडोलीत मराठा कॉलनीमध्ये असणाऱ्या श्री तुळजाभवानी मंदिरात मध्यरात्री चोरट्याने मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश करत चोरी केल्याची घटना समोर आली.
चोरट्याने भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे चांदीचे मुकुट, कमरपट्टा, देवीच्या गळ्यातील मनी मंगळसूत्रसह मंदिराची दानपेटी फोडत दीड लाखांवर ऐवज लंपास केला. पहाटेच्या पाचच्या सुमारास जेव्हा मंदिराचे पुजारी जयसिंग दळवी हे पूजेसाठी मंदिरात आले यावेळी मंदिरातील दानपेटी फुटलेल्या अवस्थेत आणि दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तत्काळ मंदिराच्या विश्वस्तांना बोलवून यासंदर्भात माहिती दिली.
मंदिराच्या विश्वस्तांनी त्वरित पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर हुपरी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पट्टणकोडोलीत चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरफोडीसह आता चोरट्यांनी मंदिरावरही आपला मोर्चा वळवला आहे.