विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन जपल्या मुलाच्या स्मृती ; बोरवडेतील बलुगडे कुटूंबियांचा आदर्शवत उपक्रम

बिद्री प्रतिनिधी :
बोरवडे ( ता. कागल ) येथील संजय शिवाजी बलुगडे यांनी मुलगा स्वरुप याच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप करुन त्याच्या स्मृती जपण्याचा आदर्शवत उपक्रम राबविला. यानिमित्ताने त्यांनी बिद्रीच्या भारतमाता हायस्कूल शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या स्वरुपचे डिसेंबर महिन्यात आकस्मिक निधन झाले होते. त्याच्या निधनाने मुलाला डॉक्टर झालेले पाहण्याचे त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहिले. आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृती कायम राहाव्यात आणि शालेय मुलांच्या शिक्षणाला पाठबळ मिळावे म्हणून त्याच्या आई-वडिलांनी वह्या वाटपाचा उपक्रम राबविला. यावेळी स्वरुपचे आजोबा शिवाजी बलुगडे, चुलते सचिन बलुगडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव फराकटे, रघुनाथ कुंभार, सर्व संचालक मंडळ, सैन्यदलातील आजी-माजी जवान, माजी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, मुख्याध्यापक एस. पी. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.