1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. प्रतीक दिवाकर चन्नावार , कंत्राटी तालुका पेसा समन्वयक संजीव येल्ला कोठारी (वय -42) व खासगी इसम अनिल बुधाजी गोवर्धन (वय-30) अशी एसीबीने गुन्हा दाखल केलेल्या लाचखोरांची नावे आहेत
याबाबत अहेरी तालुक्यातील बोरी येथील 35 वर्षाच्या व्यक्तीने गडचिरोली एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी 2022 मध्ये गोविंद गाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेतले होते. या तेंदूपानांची वाहतूक करण्यसाठी पंचायत समितीकडून वाहन परवाना आवश्यक होता. परवानगी देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितली. मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी 3 ऑगस्ट रोजी 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर उर्वरित 80 हजार व वाढीव 50 हजार रुपये असे एकूण 1 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट रोजी पडताळणी केली.
पडताळणीमध्ये चन्नावार आणि कोठारी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी सापळा रचला असता खासगी इसम अनिल गोवर्धन याच्या माध्यमातून तक्रारकर्त्याकडून 1 लाख 30 हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अनिल गोवर्धन हा लाचेची रक्कम घेऊन दुचाकीवरुन फरार झाला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर ,अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल लोखंडे ,पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले , पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस अंमलदार नथ्थु धोटे, किशोर जौजांरकर, संदीप घोरमोडे, संदीप उडान, प्रफुल डोर्लिकर यांच्या पथकाने केली.