ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनावधानाने गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण ; इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. दूधगंगा काठावर झालेली लोकजागृती आणि लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे; इचलकरंजी समन्वय समितीने सामंजस्याने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, दूधगंगा नदीतील पाणीप्रश्नी महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली होती. भुदरगड, राधानगरी, करवीर, कागल, शिरोळ या पाच तालुक्यातील आणि कर्नाटकच्या सीमाभागातील दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी काळमवाडी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचीही प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे जनता अक्षरशः कासावीस झाली होती. त्यावेळी आणि परवा झालेल्या बैठकीतही अनेक संतप्त वक्त्यांनी रक्तपाताची भाषा केली. तेच वाक्य अनावधानाने माझ्याकडून गेले. हा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हणले आहे, आतापर्यंत इचलकरंजी शहरासाठी अनेक पाणी योजना झाल्या. कृष्णा नदीवरून मजरेवाडी येथून पाणी योजनाही झाली आहे. इचलकरंजी शहरातील नागरिक हे आमचेच नागरिक आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, याबद्दल दुमत असण्याची कारण नाही. परंतु; ती योजना आता कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच झाली पाहिजे.

दूधगंगेतून यापूर्वी कमांड एरिया सोडून अनेक गावांतील शेती पाणीपुरवठा संस्थांना पाणी दिल्यामुळे व सध्याची काळमवाडी धरणाची गळती यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. परिणामी; आमच्या जमिनी जाऊनही आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार नाही ही तीव्र भावना दूधगंगा काठावरील गावांतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागली आहे. इचलकरंजी शहराला दूधगंगेतून पाणी देण्यामध्ये दूधगंगा काठावरील ग्रामस्थांमध्ये प्रचंड उठाव होऊन प्रक्षुब्धता निर्माण झाली आहे. मी, खासदार संजय मंडलिक आणि राजेंद्र पाटील -यड्रावकर आम्ही मिळून मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना भेटून विनंती करणार आहोत. या योजने संदर्भात बैठक घेण्याआधी इचलकरंजी शहरासाठी झालेल्या सगळ्या योजनांचा आढावा घ्या. त्यांचे सोशल ऑडिट करा आणि मगच बैठक घ्या.

इचलकरंजीसाठी कृष्णा नदीवरून मजरेवाडी योजनेसाठी आणखी निधी लागल्यास मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून साकडे घालू. परंतु; दूधगंगेकडे येण्याचे त्यांनी धाडस करू नये. समन्वय समितीने जी सामंजस्याची भूमिका यामध्ये घेतली आहे ती स्तुत्य आहे. तशीच भूमिका घेऊन योजना कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks