2000 रुपये लाच घेताना पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाला एसीबीकडून अटक

नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयातील लाच खोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच शुक्रवारी पंचायत समितीतील शिक्षण विभागात एक लाचखोर लिपिकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. संजय रामदास पाटील असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने ही कारवाई येवला पोस्ट ऑफिस समोर केली.
संजय पाटील हे पंचायत समिती येवला येथे शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करतात. तक्रारदार हे उपशिक्षक असून त्यांची व त्यांच्या पत्नीचे अंतीम वेतन देयक तयार करुन देण्यासाठी संजय पाटील याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता पाटील याने दोन हजार रुपये लाच मागित्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी येवला पोस्ट ऑफिससमोर सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना संजय पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर करीत आहेत.