उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा व इमारतीच्या पूर्णत्वासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करु : मंत्री हसन मुश्रीफ

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा आणि इमारतीची गरज आहे. यासाठी लवकरच मुंबईत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करु, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शिंगोली -ऊस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेताना दिली.
दोन वर्षांपूर्वी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे. आता पुढच्या वर्षांसाठी नवीन विद्यार्थ्याचे प्रवेशामुळे महाविद्यालयास जागा कमी पडत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयास होत असलेली गैरसोय पाहता या वैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जमीन संपादन करुन त्यावर इमारत बांधकाम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
श्री. मुश्रीफ यांनी या आढावा बैठकीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास जागा उपलब्ध झाल्यास तात्काळ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येईल. यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही म्हणाले. यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन आवश्यक सूचना केल्या. तसेच; याविषयी वैद्यकीय शिक्षण सचिव व उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधीची बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचेही नियोजित केले.
येथील वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक मनुष्यबळ व रिक्त असलेली पदे भरण्यासाठीही विशेष प्रयत्न करणार असल्याचेही श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले. अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व वैद्यकीय शिक्षण संघटनेची निवेदनेही स्विकारली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार, उपअधिष्ठाता डाॅ. उज्वला गवळी, डॉ.सचिन देशमुख, प्रा. डॉ. मंगेश सेलूकर, प्रा. डॉ. सुषमा जाधव, प्रा. डॉ. सदानंद भिसे, डॉ. विश्वजीत पवार, डॉ. उदयकुमार पाध्ये, डॉ. संजय मगर, डॉ. योगेश गालफाडे तसेच वैद्यकीय शिक्षण संघटनेचे पदाधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.