राज्य सरकारचा मोठा निर्णय ! पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढणार

वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण व शहरीकरण यामुळे जीवमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदलेले स्वरूप, सोशल मीडियाचा (Social Media) समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार, वाढता वापर, त्या माध्यमातून होणारे गुन्हे, इंटरनेच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणुकीचे (Financial Fraud) गुन्हे (Crime) यामध्ये मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम पोलिसांच्या कामकाजावर होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 62 वर्षापूर्वीच्या नियमात बदल करुन शासन आदेश शुक्रवारी (दि.25) जारी केला आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यातील मनुष्यबळांची संख्या वाढणार आहे. ही संख्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याची व जिल्हा स्तरावरील पोलीस ठाण्यात वेगळी असणार आहे.
शासन आदेशानुसार, राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये 23 जानेवारी 1960 च्या निकषांच्या आधारे मनुष्यबळ कार्यरत आहे. परंतु आजच्या मितीला हे मनुष्यबळ कमी पडत असून याचा परिणाम पोलिसांच्या कामकाजावर होत आहे. त्यानुसार पोलीस महासंचालक (DGP) कार्यालयामार्फत गृह विभागाकडे नवीन पोलीस ठाणे निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील आणि जिल्हा पोलीस ठाण्यांच्या आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यांसाठी मनुष्यबळाचे प्रमाणक/निकष (बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय वगळून- फेर तपासणी करुन सुधारित मनुष्यबळ प्रमाणक प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांना 166 मनुष्यबळ असणार आहे. यामध्ये 4 पोलीस निरीक्षक (PI) असणार आहेत. यामध्ये 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI), 2 पोलीस निरीक्षक आणि एक सायबर पोलीस निरीक्षक असतील. याशिवाय रजा, प्रशिक्षण, आजारपण या दरम्यान गैरहजर असणाऱ्या मनुष्यबळासाठी दहा टक्के राखीव मनुष्यबळ गृहीत धरण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक -4, सहायक पोलीस निरीक्षक (API) – 6, पोलीस उपनिरीक्षक (PSI) – 13, सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) – 13, हेड कॉन्स्टेबल (Head Constable (HC)-44, पोलीस कॉन्स्टेबल -84 एकूण – 166 असे मनुष्यबळ असणार आहे.
जिल्हा स्तरावरील पोलीस ठाण्यासाठी देखील दोन पोलीस निरीक्षक असणार आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे पोलीस निरीक्षक असतील.जिल्हा स्तरावर पोलीस ठाण्यात 146 एवढे मनुष्यबळ असणार आहे. रजा, प्रशिक्षण,आजारपण याकाळात गैरहजर असलेल्या मनुष्यबळासाठी 12 राखीव मनुष्यबळ गृहीत धरण्यात आले आहे. जिल्हा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक -2, सहायक पोलीस निरीक्षक- 3, पोलीस उपनिरीक्षक – 9, सहायक पोलीस उपनिरीक्षक – 15, हेड कॉन्स्टेबल-42, पोलीस कॉन्स्टेबल-74 एकूण – 146 असे मनुष्यबळ असणार आहे.