पाणी बचतीसह जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक : शास्त्रज्ञ अरुण देशमुख ; शाहू कारखान्यावर मार्गदर्शनपर कार्यशाळा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ऊस शेतीमध्ये पाणी बचतीसह जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत आवश्यक आहे.असे प्रतिपादन व्हीएसआयचे माजी शास्त्रज्ञ अरुण देशमुख यांनी केले.
येथे श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत कारखाना कार्यस्थळावर शेती विभागाचे कर्मचारी व निवडक शेतकरी यांच्यासाठी “आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान” या विषयावर आयोजित कार्यशाळवेळी ते बोलत होते.
श्री.देशमुख पुढे म्हणाले, रासायनिक खतांच्या भरमसाठ वापरामुळे ऊसाचे उत्पादन वाढणार नाही. मात्र जमिनीची प्रत खालवणार आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बावर जमिनीची सुपीकता अवलंबून असून तो वाढवण्यासाठी रासायनिक खतांचे प्रमाण कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.ठिबकद्वारे खत व पाणी व्यवस्थापन केल्यास दिलेल्या खतांचा कार्यक्षमपणे वापर होईल.जमीनीची प्रत चांगली राहून उत्पादनात वाढ होईल.याशिवाय चार ते पाच फुट रुंद सरी पद्धतीने लागवड,दर्जेदार बियाणे वापर,योग्य पुर्व व आंतर मशागत,रासायनिक ,सेंद्रिय व जैविक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर,प्रभावी रोग,कीड व तण नियंत्रण केल्यास एकरी शंभर टन ऊस उत्पादन शक्य आहे.असेही म्हणाले.
प्रास्ताविक मनोगतात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शाहू कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरी हिताच्या धोरणामुळे संशोधन केंद्रातील अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यात शाहू कारखाना अग्रेसर आहे.त्यासाठी त्यांनी स्वतंत्र ऊस विभागाद्वारे विविध ऊस विकास योजना यशस्वीपणे राबविल्या.त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ऊस पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणी,ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी सीएनजी गॕस कीट अशा नाविन्यपुर्ण योजनांची भर घातली आहे. शाहूच्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन खर्चात बचत करावी.व ऊस उत्पादनात वाढ करुन किफायतशीर ऊस शेती करावी.
आभार ऊस विकास अधिकारी डी.बी.जाधव यांनी मानले.
खोडवा किफायतशीर …..
ऊस शेतीत खोडवा पिकाचा लागण पिकाच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी येतो.त्यामुळे ऊसाचे एकपेक्षा अधिक खोडवा पिके घेणे किफायतशीर असल्याने ती शेतकऱ्यांनी घ्यावीत.असे आवाहन देशमुख यांनी केले.