रोग होऊच नये हेच आयुर्वेदाचे मूळ सूत्र : वैद्यकीय शिक्षण व विशेष शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा उत्साहात

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आयुर्वेद हे शाश्वत आरोग्य शास्त्र म्हणून संपूर्ण जगभरच प्रचलित आहे. रोग होऊच नये हेच आयुर्वेदाचे मूळ सूत्र आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन यांनी केले.
कोल्हापुरात गडहिंग्लजच्या कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पदव्युत्तर पदवी आणि पदवीच्या दीक्षांत सोहळ्यात मंत्री श्री. बोलत होते. दीक्षांत समारंभाचे उद्घाटन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या आरोग्य शास्त्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ आणि आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद आवारे उपस्थित होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आयुष्यभर रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून काम करा. गोरगरिबांची सेवा करा आणि आशीर्वाद मिळवा. नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या सोयीसुविधा वापरून आयुर्वेदामध्ये जास्तीत -जास्त संशोधन करा.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, कठोर परिश्रमातून तुम्ही सर्वांनी मिळवलेल्या या पदवीचा आनंद मोठा आहे. सदैव कष्टाची तयारी करा ठेवा आणि नवनवीन ज्ञान अवगत करा. पदवी मिळविणे हा तुम्हा सर्वांच्या आयुष्यातील पहिला टप्पा आहे. रुग्णांशी आपुलकी आणि प्रेमाचे नाते निर्माण करा. आई-वडिलांनी आपला आनंद बाजूला ठेवून तुम्हाला उभं केलं आहे, त्यामुळे आई-वडिलांना विसरू नका.
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ म्हणाले, पदवी मिळविली यावर समाधान मानू नका. आपल्या ज्ञानाचा समाजाला फायदा होईल, अशा संशोधनासाठी अनेक वाटा मोकळ्या आहेत.
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद आवारे म्हणाले, या पदवीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी आदर्श वैद्य निर्माण व्हावे, ही अपेक्षा आहे.
शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर म्हणाल्या, कै. केदारी रेडेकर यांच्या स्मरणार्थ या महाविद्यालयाच्या रूपाने छोटेसे रोपटे लावले होते. अनेक संकटातून मार्ग काढत आज त्याचा वटवृक्ष झाल्याचे पाहताना आनंद वाटतो.
रोपट्याचा वटवृक्ष……!
शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अंजना रेडेकर म्हणाल्या, या शिक्षण समूहासाठी प्रसंगी मुंबईतील फ्लॅटसुद्धा विकला. आमदार सतेश उर्फ बंटी पाटील म्हणाले, या महाविद्यालयाने कोरोनाकाळात हजारो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कै. केदारी रेडेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ मोठ्या हिमतीने महाविद्यालय स्थापण्याचे आणि यशस्वीपणे चालविण्याचे धनुष्य श्रीमती अंजना रेडेकर यांनी सक्षमपणे पेलले.
यावेळी डॉ. प्रतीक जांगिलवार, डॉ. उन्मेश देशमुख, डाॅ. सुधा, डॉ. सानिया खान या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची मनोगतेही झाली.
स्वागत डॉ. किरण पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. सौ. विणा कंठी व उपप्राचार्य डाॅ. पंकज विश्वकर्मा यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. सुधीर येसणे यांनी केले. आभार उपप्राचार्य डाॅ. पंकज विश्वकर्मा यांनी मानले.
व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव प्रा. सुनील शिंत्रे, सौ. प्रणीता शिपुरकर, डॉ. विराज शुक्ला, डॉ. विजय रुद्रापगोळ, डाॅ. शैलेंद्र सावंत, डाॅ. विभावरी कोकणे, डॉ. अमोल जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.