सावकारी लायसन्सच्या कामासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात

सावकारी लायसन्स मिळवण्यासाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन तसेच पाठपुरावा करण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वेल्हे येथील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.16) केली आहे. पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर असे लाच मागणाऱ्या लिपीकाचे नाव आहे.
तक्रारदार यांना सावकारी लायसन्स काढायचे होते. या कामासाठी ते सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या वेल्हे येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी लिपीक पंढरीनाथ तमनर यांनी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करुन लायसन्स मिळवून देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने 29 मे रोजी पडताळणी केली असता, पंढरीनाथ तमनर यांनी सावकारी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरवा करुन लायसन्स मिळवून देण्यासाठी 30 हजार रुपये व स्वत:साठी 20 हजार असे एकूण 50 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.तसेच लाचेची रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.
लाच मागिल्याप्रकरणी पुणे एसीबीने वेल्हे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन पंढरीनाथ तमनर याला अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या पथकाने केली.