लोकसभेच्या चारशेहून अधिक जागेचा टप्पा पार करण्यासाठी जोमाने कामाला लागा : राजे समरजीतसिंह घाटगे यांचे आवाहन ; कागल तालुक्यातील भाजपाची नूतन कार्यकारिणी जाहीर

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या अजेंड्यानुसार चारशेहून अधिक जागेचा टप्पा पार करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन भाजपाचे जिल्ह्याचे नेते,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
कागल येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात भाजपाच्या कोल्हापूर जिल्हा पश्चिम कागल मंडल च्या नूतन कार्यकारिणीची निवड केल्यानंतर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी 150 हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्याना नियुक्तीपत्रे देऊन भाजपाचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले,स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांना अपेक्षित असणारे उत्तम संघटन आणि व्यवस्थापन हे भाजपामध्ये आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून येणारे आदेश शिरसावंद्य मानून सर्वच पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी जोमाने कामाला लागावे .देशहितासाठी, प्रगतीसाठी आणि सुरक्षेसासाठी सर्वांनीच मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकीची वज्रमूठ आवळून कामाला लागावे असेही श्री. घाटगे म्हणाले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, कागल तालुका भाजपा अध्यक्ष उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तामामा खराडे, जिल्हा सरचिटणीस विवेक कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, शाहू कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,प्रा. सुनील मगदूम, युवराज पसारे, अरुण गुरव यांच्यासह शाहू ग्रुपच्या विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत भाजपा युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष अमोल शिवई यांनी केले.प्रास्ताविक भाजपा ओबीसी चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले. आभार भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष स्नेहल प्रदीप पाटील यांनी मानले.
…. पंतप्रधान मोदीजी ही
” गॅरंटी “आयोध्या येथे राम लल्लांचे मंदिर उभारणीच्या भाजपाने केलेल्या घोषणेवर विरोधकांनी अनेकवेळा टीकाटिप्पणी केली. 2014 नंतर मोदीजी सत्तेवर आले नसते तर आयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी हे केवळ स्वप्नच उरले असते.मात्र सत्तेवर येताच मंदिराची उभारणी करून मोदी है, तो मुुमकीन है, हीच मोदींची गॅरंटी तळागाळातील जनतेला पक्की पटली असल्याचे राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.