टोमॅटो पाठोपाठ मसाल्यांचे दर देखील वाढले ; सर्वसामान्यांच्या खिशावर वाढला बोजा

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहे. वाढीव किंमतींमुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. टोमॅटोची भाववाढ सुरू असतानाच आता इतर गोष्टी देखील महागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढणारी महागाई ही गृहिणींसाठी त्रासदायक ठरत आहे. टोमॅटो पाठोपाठ आता आले, कांदा, हळद आणि जिऱ्याचा भावानेही उसळी घेतलीये.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढत आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत डाळी, तांदूळ, हळद आणि जिरे यांच्या किमतीतही 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा दिल्लीतील व्यापाऱ्यांनी केला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत या पदार्थांच्या किमती आणखी वाढू शकतात, असे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. टोमॅटो, आले, हिरवी मिरची आणि सिमला मिरचीचे दर सर्वाधिक वाढले आहेत.
गेल्या महिनाभरात जिरे 250 रुपयांनी महागले आहेत. महिन्यापूर्वी 500 रुपये किलो असलेले जिरे आता 750 रुपये किलोवर पोहोचला आहे. स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे मसाले बजेटच्या दृष्टीनेही चव खराब करत आहेत. फोडणी देणारे जिरे हे प्रत्येक पदार्थांची चव वाढवतात पण इतर मसाल्यांची मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढले आहे.