दक्षिण भारत जैन सभा संस्कार, शिक्षण व आरोग्य उपक्रमातून समाजाच्या तळागाळात पोहोचलेली संस्था, सभेचे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न करणार : आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली संस्कार, शिक्षण व आरोग्य उपक्रमातून जैन समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभा पोहचली आहे. सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होण्यासाठी मी व पदाधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मोठ्या प्रमाणात समाज व सभेच्या शाखांनी शक्य असेल ती मदत करावी. जैन समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.. लवकरच त्यांची तारीख निश्चित करण्यात येईल
असे आज बोरगाव ता. चिकोडी येथे अरिहंत सभागृहात अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. ना. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले.सभेच्या शंभराव्या अधिवेशनाचे बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.त्यांच्या हस्ते शंभराव्या अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण धुमधडाक्यात झाले.रावसाहेब दादांच्या हस्ते ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा होते. रावसाहेब दादा म्हणाले, ” गेल्या दहा वर्षांत शाखांची इमारत बांधकामे, शिष्यवृत्ती निधीत कोट्यवधींची वाढ, संस्कार, शिक्षण व आरोग्य उपक्रम, स्थावर मालमत्तेत झालेली कोट्यवधी रुपयांची वाढ, समाज संपर्क, श्री क्षेत्र स्तवनिधीचा विकास, सभागृह बांधणी असा चौफेर विकास झाला आहे. सभेचे शंभरावे अधिवेशन सांगलीत होत आहे. कर्नाटकचे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात सभेने केलेले काम व भविष्यातील संकल्प यावर चर्चा होईल व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सवलतीच्या योजनांचा लाभ जैन समाजाला होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशनानिमित्त जनजागृती दिंडी आयोजन व वंदनीय भट्टारक संमेलन भरविण्यात येईल. ”
प्रारंभी मुख्यमहामंत्री डाॅ. अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व महिला परिषद, वीर महिला मंडळ, वीर सेवा दल आणि पदवीधर संघटना या सभेच्या शाखांची अधिवेशने होतील अशी माहिती दिली. सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील नाना यांनी अधिवेशन समिती पदाधिकारी निवड व विविध समित्या गठणाबाबत माहिती दिली व हे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होण्यासाठी स्मरणिका जाहिरात व निधी संकलन कामी शाखांचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी गावोगावी संपर्क साधून जाहिरात व निधी संकलनासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. सुरेश पाटील यांनी परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना करुन स्थायी स्वरुपात समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सीएसआर निधी उभारण्यात यावा अशी सूचना केली.
यावेळी सभा, शाखा व अधिवेशन समिती पदाधिकारी बैठक झाली व त्यामध्ये अधिवेशन समितीचे सेक्रेटरी प्रा. एन.डी. बिरनाळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त व विविध समित्यावरील सदस्य निवड यादी वाचून दाखवली. यावेळी अधिवेशन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश आ. पाटील, सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे, खजिनदार सागर वडगावे,उपाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चोपडे, राजाराम पाटील, सुरेश जिनगोंडा पाटील, सचिन तात्यासो पाटील, जॉइन्ट सेक्रेटरी अरुण यलगुद्री, अनिल पाटील, बबन थोटे, सुदर्शन हेरले, संतोष देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. जैन मंदीर जिर्णोद्धार कामी भरीव कामगिरी केलेले संजय कणीरे यांचा विशेष सत्कार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. आभार संजय शेटे यांनी मानले. यावेळी चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील नाना, व्हा. चेअरमन माधव डोर्ले, मुख्यमहामंत्री डाॅ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पा. पा. पाटील व सभेच्या कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध शाखांचे पदाधिकारी आणि अरिहंत परिवार उपस्थित होता.