कोरोनाचे नियम पाळत शाळा १३ जूनपासून भरणार !

टीम ऑनलाईन :
कोरोनाच्या रूग्णांच्या दिवसागणिक वाढणाऱ्या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वात आधी चिंता सतावतेय ती म्हणजे पालकवर्गाला. पण मुंबई महानगरपालिकेने मात्र शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत ठरल्याप्रमाणे येत्या १३ जून पासून सुरु होतील असे स्पष्टीकरण दिले आहे.
कोरोना वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत पालिका शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाची पहिली लाट थोपवण्यात यश आल्यानंतर शाळा सुरु करण्यात आल्या.
मात्र त्यानंतर कोरोनाची दुसरी व तिसरी लाट आल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. सध्या शाळांना सुट्टी असून दरवर्षीप्रमाणे १३ जून रोजी मुंबईतील पालिका शाळा सुरु केल्या जातात. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरु होणार का यावर प्रश्नचिन्ह होते.
याबाबत पालकांमध्ये भिती व संभ्रमावस्था आहे. मात्र कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर येत्या १३ जूनपासून शाळा नियमितपणे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना नियम व खबरदारी घेऊन शाळा सुरु केल्या जाणार आहेत.