महापूरात कोल्हापुरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही! नितीन गडकरी यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिले आश्वासन

कोल्हापुर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
महापूरात राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी ठप्प होऊ नयेत. यामुळे आवश्यक ती मदत व बचावकार्य राबविण्यासाठी पूरबाधित शहरांचा संपर्क तुटू नये, यादृष्टीने महामार्गांची बांधणी करावी, याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व पत्र दिले. यावर गडकरीजी यांनी अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन कोल्हापूरचा संपर्क कधीही तुटू नये यावर मार्ग काढू असे छत्रपतीसंभाजीराजे यांना आश्वासन दिले…
पत्रात असे लिहले……
प्रिय नितिन गडकरीजी,
आपल्याला माहीत आहेच की भूगर्भीय बदल आणि अतिवृष्टी यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात महापूर ही नित्याची बाब झाली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांतील लोक २०१९च्या महापुरातून सावरण्याचा प्रयत्न करतच होते तेवढ्यात यावर्षी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली, अर्थात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप मोठ्या भागालाही पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे.
गेल्या काही दिवसांत, सतत पडणारा मुसळधार पाऊस, महापूर आणि दरडी कोसळणे यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या भागांत पुराचे पाणी साठल्यामुळे येथील लोकांना अनेक गंभीर अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, वाहतूक, संपर्क, वीज, नागरी व्यवस्था पार कोलमडून गेल्या आहेत. अनेक पूरग्रस्त खेड्यांमधील लोकांना त्यांची घरे गमवावी लागली आहेत. त्यांची पिके वाहून गेली आहेत आणि आता त्यांच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन उरलेले नाही.
जवळजवळ सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सर्व राज्य मार्गही पाण्याखाली असल्याने कोणतीही वाहतूक होणे अशक्य आहे. पूरग्रस्त भागांचा जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. अनेक पूल एक तर वाहून गेलेत किंवा कोसळले आहेत.
सध्याची पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूरपरिस्थिती पाहता, मला खालील उपाय सुचवावेसे वाटतात :
१. सध्या बांधत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा स्तर पूर्वी आलेल्या पुराच्या पाण्याच्या कमाल पातळीपेक्षाही जास्त वाढवावा आणि त्याचबरोबर पाणी उंचावरून उताराकडे सहज वाहून जावे यासाठी मोठे नळे आणि पूल बांधले जावेत. त्याचप्रमाणे या भागातील इतर राष्ट्रीय महामार्गांचीही उंची वाढवावी, जेणेकरून पूरस्थितीचा मुकाबला चांगल्या तर्हेने करता येईल. वास्तविक, राष्ट्रीय महामार्ग हे आणीबाणीच्या प्रसंगी “ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून उपयोगात यायला हवेत आणि अगदी बिकट स्थितीतही ते चालू राहिले पाहिजेत.
२. राष्ट्रीय महामार्ग हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील लोकांसाठी जीवनरेखा आहेत. त्यांचे नियोजन करताना एनएचएआयने इस्रो आणि एमआरएसएसी, नागपूर यांच्याशी सल्लामसलत करावी आणि त्यांना रस्ते बांधणीच्या नियोजनात सहभागी करून घ्यावे, उपग्रहांकडून मिळणार्या डेटाचा रस्ते बांधताना विचार केला तर अगदी गंभीर पूर स्थितीत रस्ते अत्यावश्यक वाहतुकीसाठी आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयार असतील.
जवळजवळ दरवर्षी येणार्या पुराचा सामना करावा लागणार्या लोकांच्या हिताचा विचार करून मी वरील उपाय सुचवले आहेत, त्यांचा जरूर विचार करण्यात यावा.