कोल्हापूर : मिश्रखत उत्पादकांच्या अडचणी सोडवा ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मिश्र खत उत्पादक संघटनेची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्ह्यातील मिश्रखत उत्पादकांच्या अडीअडचणी सोडवा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मिश्रखत उत्पादक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मिश्रखत उत्पादकांच्या अडचणींबाबत चर्चा झाली. या बैठकीला आमदार राजेश पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराजबापू पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, ॲड. जीवनराव शिंदे, शिवाजीराव देसाई, तानाजी निगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सर्वच मिश्रखत उत्पादन युनिट्स बंद करण्याच्या हेतूने केंद्रीय अधिकाऱ्यांमार्फत वारंवार तपासण्या होऊन होणारा त्रास थांबवा. पाॅश मशीनचा खतसाठा व गोडाऊनचा खतसाठा यामध्ये किरकोळ तफावत दाखवून कारणे दाखवा नोटीस देऊन युनिट बंद करून सुनावणी पुणे आयुक्तालयांकडे लावली जाते. संघाचा किंवा दुकानाचा दरफलक नसणे, होलसेल व रिटेल गोडाऊन एकत्र असल्याबद्दल त्रुटी दाखवून बॅगवरील लॉट नंबर व तारीख पुसट दिसणे, अशा किरकोळ कारणांनी सुनावणी लावली जाते. दरम्यान; या काळात गोडाऊनमध्ये असलेल्या सर्व मालाच्या विक्रीला बंदी केली जाते. मिश्रखत उत्पादन स्थळावर शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेल्या सॅम्पल शासकीय लॅबमध्ये प्रमाणित होऊनसुद्धा त्या मालाची परत सॅम्पल काढली जाते व असे नमुने नापास करून विक्रीवर बंदी घातली जाते. त्या मालाच्या विक्रीसाठी परवानगी मिळावी. तसेच; हात मिश्रखताचा नमुना प्रयोगशाळेकडे पाठविला असताना विश्लेषण रिपोर्ट ग्रॅन्यूलर म्हणजेच दाणेदार म्हणून दिले आहेत. संयुक्त खते व सरळ खते उपलब्ध असताना मिश्रखते कशाला हवीत? अशी तोंडी विचारणा होते.
या बैठकीला रयत सेवा कृषी उद्योग संघ, चंदगड तालुका खरेदी विक्री संघ, आजरा तालुका खरेदी विक्री संघ, राधानगरी तालुका खरेदी विक्री संघ, कागल तालुका खरेदी विक्री संघ, यशवंत कृषी उद्योग संघ- पन्हाळा, शिरोळ तालुका कृषी उद्योग संघ या मिश्रखत उत्पादक संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मिश्रखते बंद करण्याचा घाट……..
निवेदनात म्हटले आहे, सर्व मिश्रखत युनिट्स साठ वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षे कार्यरत आहेत. त्याचे कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील मिश्रखतांचा दर्जा चांगला असून मिश्रखते किमतीने कमी आहेत. दर्जेदार पेंड वापरून मिश्रखते तयार करून विनालिंकिंग शेतकऱ्यांना विकली जातात. असे असताना मिश्रखते बंद करण्याचा हा घाट घातलेला दिसतो…..