ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
राजकीय किड्यांच्या आणि संबंधित खात्या मधील अधिकारी रेड्यांच्या दुर्लक्षामुळे घडली दुर्दैवी घटना : मच्छिंद्र मुगडे यांनी केली फेसबुक द्वारे टीका.

गारगोटी प्रतिनिधी :
राजकीय किड्यांच्या आणि संबंधित खात्या मधील अधिकारी रेड्यांच्या दुर्लक्षामुळे घडलेली दुर्दैवी घटना आहे, असे मत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र संभाजीराव मुगडे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केले आहे.

सविस्तर पोस्ट :
मेघोली धरण फुटले ही कुठल्या खेकड्याची करामत नसून राजकीय किड्यांच्या आणि संबंधित खात्या मधील अधिकारी रेड्यांच्या दुर्लक्षामुळे घडलेली दुर्दैवी घटना आहे.
कोकणातील चिपळूण मधील तिवरे धरण हे खेकड्याने फोडले असे वक्तव्य तात्कालीन मंत्र्यांनी करून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. पण भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण कुठल्या खेकड्याने फोडलेले नसून राजकीय किड्यांच्या आणि संबंधित खात्याच्या अधिकारी रेड्यांच्या दुर्लक्षामुळे फुटलेले आहे. भुदरगड तालुक्यातील राजकीय नेतृत्वाने आणि स्थानिक नेतृत्वाने धरणाच्या गळती विषयी फक्त चर्चाच केली. शासन स्तरावर अधिकारी वर्गाकडे पाठलाग करून गळती थांबवावी, तातडीने त्याच्यावर काहीतरी उपाय योजना कराव्यात हा साधा विचार देखील राजकीय नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी केला नाही. त्याउलट नेत्यांनी राजकीय उट्टे काढण्यासाठी मेघोली धरणावर कार्यरत असणाऱ्या चौकीदाराची सहा महिन्यापूर्वीच अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून चंदगडला बदली केली. तो कर्मचारी स्थानिक असल्यामुळे रोजच्या रोज मेघोली धरणासह अन्य धरणांची अपडेट प्रशासनापर्यंत कळवत होता. त्यानंतर या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने धरण स्थळावर चौकीदारच नेमला नाही. चौकीदारा आभावी प्रशासनाकडे धरणाचे अपडेट न कळल्यामुळे धरण फुटले की काय? हा प्रश्न आज उपस्थित होतोय.
राजकीय नेतृत्वाने कोणत्या गोष्टीसाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकावा या गोष्टीचे आत्मचिंतन भुदरगड तालुक्यातील राजकीय नेतृत्वांनी करायला हवे. आणि अधिकाऱ्यानीं देखील कोणत्या गोष्टीसाठी राजकीय नेतृत्वाने टाकलेल्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करावीत याचदेखील अधिकारी वर्गाने आत्मचिंतन करावं.
आज यांच्या राजकारणामुळे ( चौकीदाराच्या केलेल्या सूडबुद्धी च्या बदलीमुळे) आणि राजकीय व्यक्तींचा दबाव झेलणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुळे आज भुदरगड तालुका एका भगीनीच्या जीवासह अनेक मुक्या जीवांना मुकलेला आहे. त्याचबरोबर भुदरगड तालुक्याच न भरून निघणार असं आर्थिक नुकसान झालेलं आहे.
आज भुदरगड तालुक्यांमध्ये अनेक धरणांची बांधकामे चालू आहेत. गेली वर्षभर आम्ही टाहो फोडून सांगत आहोत. चालू असलेल्या बांधकाम मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम चालू आहे. तरी देखील राजकीय नेतृत्व करणार्यांनी कंत्राटदारांचीच बाजू उचलून धरलेले आहे. आणि या राजकीय बांडगुळांना सामील संबंधित खात्याचा अधिकारी वर्ग
आता आणखीन जीवांना मूठमाती द्यायची की भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांनां, अधिकाऱ्यांनां आणि यांना साथ देणाऱ्या भुदरगड तालुक्यातील राजकीय नेतृत्वांनां मूठमाती द्यायची हे आता ठरवण्याची वेळ सर्वसामान्य भुदरगडकरांच्या समोर येऊन ठेपलेली आहे.
कळावे,
मच्छिंद्र संभाजीराव मुगडे
अध्यक्ष प्रहार संघटना भुदरगड