कागल तालुक्यातील दौलतवाडी येथे वाघसदृश प्राण्याचे पुन्हा दर्शन ; परिसरात भीतीचे वातावरण

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील दौलतवाडी येथे शनिवारी पुन्हा वाघसदृश प्राणी दिसल्याचे शेताकडे गेलेल्या महिला सांगत काम अर्धवट सोडत घरी निघून आल्या. तळी नावाच्या शेतातून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कानडे यांच्या शेताजवळ जाधव परिवारातील महिलांना दर्शन झाले.
बुधवारी संध्याकाळी मुरगूड पोलिसाला स्मशानशेडनजीक वाघ सदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. वन विभागातील अधिकाऱ्यांनी या जंगल भागात शोध घेण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना त्याचा काही सुगावा लागला नव्हता. हा तरस असेल असे सांगून वन विभागातील अधिकारी निघून गेले होते. दौलतवाडीच्या डोंगर रांगांचा परिसर हा मोठा असून किल्ले भुदरगडपर्यंतच्या परिसराला एकाच डोंगररांगांनी जोडले गेले आहे. बोळावी परिसरात गव्यांचे दर्शन होते. दौलतवाडी येथे अशा प्राण्याचे दर्शन झाल्याने शेजारील गावांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.