ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाच्या सुविधा उभारणार ; वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही ; छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सोयी -सुविधांची केली पाहणी

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राज्यातील सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयामध्ये चांगल्या सोयी -सुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी लवकरच उभा केला जाणार आहे. बँकांकडून कर्ज स्वरुपात मोठ्या प्रमाणात निधी घेवून उच्च दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे केले. कोल्हापूर दौऱ्यांवर त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची (सीपीआर) पाहणी केली. यावेळी त्यांनी अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, जनरल वॉर्ड तसेच डायलेसिस विभागात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनतर रुग्णालयातील डॉक्टर, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी सोबत डॉ.अजय चंदनवाले, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गिरीश कांबळे उपस्थित होते.

सीपीआर रुग्णालय लोकांसाठी जीवदान देणारे रुग्णालय असून, त्यांच्या मनातील रुग्णालयाविषयाची धारणा अधिक चांगली करण्याची गरज आहे. यासाठी या ठिकाणी अद्ययावत व सर्व सुविधांयुक्त विभाग असायला हवेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

कोल्हापूरातील नवीन शेंडा पार्क येथील रुग्णालय चांगल्या पध्दतीने तयार केले जात आहे. यासाठी 842 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या ठिकाणी वसतीगृह, परिचारिका केंद्र, फॉरेंसिक इमारत, महिला व पुरुष डॉक्टरांचे स्वतंत्र वसतिगृह यांचाही समावेश आहे. त्या ठिकाणी येत्या तीन ते चार वर्षात चांगली इमारत उभी करु, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. तोपर्यत सीपीआर मधील आवश्यक डागडूजी, औषधे व साहित्याची कमतरता पडू देणार नाही. जिल्हा वार्षिक योजनेतून 20 कोटी औषधासाठी व 20 कोटी शस्त्रक्रीया साहित्यासाठी दिले जात आहेत. रुग्णालयातील पदभरती बाबतही त्यांनी शासनाकडील पदे तातडीने भरण्यासाठी संचालकांना सूचना केल्या. तसेच जिल्हास्तरावरील ‘ड’ वर्ग पदे भरण्यासाठीही निर्देश दिले. आत्ताच ‘क’ वर्ग भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही लवकरच होतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वाढत्या हृदयरोग व गुडघ्यांच्या समस्येबाबत लक्ष वेधले. ते म्हणाले, या दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. डॉक्टरांसाठी चांगल्या सुविधा देणार. वैद्यकीय शिक्षण घेत असताना सर्वच डॉक्टर स्कॉलरशिप घेतात. मात्र; शासकीय दवाखान्यात सेवा देण्यास टाळाटाळ करतात. त्यासाठी कायदाही आणणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी बैठकीत सांगितले. मात्र हे करत असताना शासकीय रुग्णालयात सेवा देत असताना त्यांना चांगल्या सुविधा, चांगले वातावरणही देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्यांना सेवा देत असताना डॉक्टरांनी आपली धारणाही बदलायला हवी. आपल्याकडे आलेले रुग्ण बरे होतील हा विश्वास रुग्ण व नातेवाईकांमध्ये जागृत करण्याचे काम त्यांचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks