महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांना 25,000 हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीच्या कोर्टाने बृजभूषण सिंह यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बृजभूषण सिंह यांना देशाबाहेर जाता येणार नाही ही अट न्यायालयाने त्यांना जामीन देताना ठेवली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर कायद्यानुसार खटला चालवला जावा आणि दिलासा देण्यासाठी काही अटी घालण्यात याव्यात, असं सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
कोर्टातील युक्तिवाद काय?
जामीन अर्जाला तुमचा विरोध आहे का असा प्रश्न यावेळी न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारला. त्यावर सरकारी वकिलांनी म्हटलं की, “मी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करत नाही आणि समर्थनही करत नाही.” “कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दाखल याचिकेवर निकाल देण्यात यावा,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.’
तर कुस्तीपटूंच्या वकिलांनी युक्तिवाद करत या जामीन अर्जाला विरोध केला. तसेच आरोपी अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांना जामीन दिला जाऊ नये, असंही त्यांनी पुढे म्हटलं. “जर आरोपीला जामीन देणार असाल तर कठोर अटी आणि शर्तींसह घालायला हव्यात,” असाही युक्तिवाद कुस्तीपटूंच्या वकिलांनी केला.
तर बृजभूषण सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं की, “बृजभूषण सिंह हे न्यायालयाने दिलेल्या नियमांचं योग्य पालन करतील. आरोपीला जामीन दिला पाहिजे. न्यायालयाने दिलेल्या सर्व नियम आणि अटींचे पालन करण्यात येईल अशी ग्वाही मी देतो.”
पोलीसांनी या प्रकरणात 1599 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये बृजभूषण सिंह आणि कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपपत्रात एकूण 44 साक्षीदार आहेत. तर आरोपत्रात एकूण 108 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये 15 लोकांनी कुस्तीपटू महिलांच्या बाजूने साक्ष दिली आहे.