50 हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलिस उप निरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात , प्रचंड खळबळ

दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरिता 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजाराची लाच घेणार्या महिला पोलिस उप निरीक्षकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे . महिला पीएसआयच्या विरूध्द उरण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सिंधु तुकाराम मुंडे (पद – पोलिस उप निरीक्षक, उरण पोलिस ठाणे, नवी मुंबई) असे लाच घेणार्या महिला पीएसआयचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांविरूध्द गुन्हा दाखल आहे . दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरिता पीएसआय सिंधु मुंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरूवातीला 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 50 हजार रूपयाचे घेण्याचे ठरले.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्ररीची पडताळणी करण्यात आली. दि. 14 जून 2023 रोजी पीएसआय सिंधु मुंडे यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रूपये घेतले. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द उरण पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे ,अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक अश्विनी संतोष पाटील ,पोलिस हवालदार शिंदे, पाटील, पारधी आणि त्रिभुवन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
महिला पीएसआयला 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.