उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे रोखठोक आणि परखड नेतृत्व ; वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे रोखठोक आणि परखड असे विकासाभिमुख नेतृत्व आहे, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. येथे आयोजित महारक्तदान शिबिरात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. या कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दोन्हीही मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा सकाळी लवकर उठतात. त्यांचे निर्व्यसनी व्यक्तिमत्व, परखड बोलणे, रोखठोक स्वभाव आणि विशेष म्हणजे वक्तशीरपणा हे गुण आपण सर्वच कार्यकर्त्यांनी अंगीकारुया.
चांगले योग………
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आमचे दैवत शरद पवारसाहेब व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी येतो. तसेच; राज्याचे दोन्हीही विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व श्री. अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आज एकाच दिवशी आहे. हा चांगला योग आहे.
महारक्तदान शिबिराच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय, संजीवन ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक या तीन रक्तपेढ्यांच्या विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात ५०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष अदील फरास, राजेश लाटकर, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितलताई फराकटे, गोकुळ संचालक प्रा. किसन चौगुले, आसिफ फरास, सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, महीला शहराध्यक्ष जहीदा मुजावर, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, प्रवीणसिंह भोसले, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, माजी नगरसेवक अनिल कदम, अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष मुनीर शेख, राजाराम धारवट, अमित गाताडे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहर युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. प्रा. मधुकर पाटील यांचेही मनोगत झाले. आभार स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी मानले.