11 हजार रुपये लाच स्वीकारताना महिला वैद्यकीय अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुर झालेल्या अनुदानाची 22 हजार रुपयांची रक्कम बेकायदेशीररित्या बिले तयार करुन काढण्यास सांगितले. तसेच या बिलाची अर्धी रक्कम 11 हजार रुपये लाच म्हणून स्वीकारणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. डॉ. रेखा श्रावण सोनावणे (वय-44) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.19) शहापूर तालुक्यातील पिवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी दीड वाजता सोनवणे यांच्या कार्यालयात केली.
याबाबत 50 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.18) ठाणे एसीबीकडे तक्रार केली आहे. डॉ. रेखा सोवनणे या प्राथमिक आरोग्य केंद्र, पिवळी गाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. शासनाकडून आरोग्य केंद्राला 22 हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. अनुदानाची रक्कम बेकायदेशिररित्या बिले तयार करुन काढण्यास तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार यांनी नकार दिला असता डॉ. सोनावणे यांनी तक्रारदार यांना वार्षिक गोपनिय अहवाल (एसीआर-ACR) खराब करण्याची आणि पिवळी पथकामध्ये व्यवस्थित काम करीत नसल्याचा खोटा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे अनुदानातील अर्धी रक्कम 11 हजार रुपये लाच म्हणून मागणी केली.
मात्र तक्रारदार यांना डॉ. रेखा सोनावणे यांना लाच देणे मान्य नसल्याने मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत लेखी तक्रार केली. कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथकाने बुधवारी (दि.19) पडताळणी केली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनावणे यांनी 11 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 11 हजार रुपये लाच स्वीकारताना डॉ. सोनावणे यांना त्यांच्या कार्य़ालयात रंगेहाथ पकडण्यात आले. डॉ. रेखा सोनावणे यांच्यावर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील जुईकर पोलीस अंमलदार योगेश परदेशी, मोरे, पवार, गायकवाड, महिला पोलीस हवालदार शेख, सांबरे यांच्या पथकाने केली.