3 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह तिघांवर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा

5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 लाख रूपये घेतल्याप्रकरणी अॅन्टी करप्शनच्या पथकाने खाजगी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे . दरम्यान, याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह एका पोलिस अंमलदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड (पो.नि. बाजारपेठ पोलिस स्टेशन, भुसावळ- , जि. जळगाव), पोलिस नाईक बक्कल नंबर 303 तुषार पाटील (नेमणूक – बाजारपेठ पोलिस स्टेशन, भुसावळ, जि. जळगाव) आणि खाजगी व्यक्ती ऋषी दुर्गादास शुक्ला (रा. हनुमान वाडी, भुसावळ, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी पोलिस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड व पोलिस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून व प्रोत्साहित केल्यावरून ऋषी दुर्गादास शुक्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे 5,00,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 3,00,000/- रुपये रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील ,पोलिस अंमलदार संतोष पावरा, रामदास बारेला, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.