अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला , पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण ; शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट होत आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे आजही शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अधिवेशनानंतर आमदार शरद पवारांच्या भेटीला
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज सभागृहाचं पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठीकनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. यावेळी शरद पवारही आपल्या सिल्व्हर ओक वरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.
शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न ?
काल (रविवार) अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे नऊ मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांच्या भेटीची वेळ घेतली नव्हती. त्यावेळी काही मनिटे चर्चा केल्यानंतर अजित पवार गट बाहेर आला होता. या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहण्यासाठी शरद पवारांना आपल्यासोबत सरकारसोबत समील होण्याची विनंती केली होती. परंतु, शरद पवारांनी अजित पवारांचा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. पक्ष एकसंध राहण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढावा, असे अजित पवार गटाने म्हटले होते.
आमदारांच्या भेटीबाबत शरद पवार अनभिज्ञ
शरद पवारांच्या गाटातील आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी दोन वाजता बैठक होती.
परंतु ही बैठक सुरु होण्यापूर्वीच अजित पवार गटातील आमदार वायबी सेंटरवर पोहचले.शरद पवार यांना सर्व आमदार येणार असल्याची कल्पना नव्हती.शरद पवार येण्यापूर्वीच वायबी सेंटरवर जाऊन बसावं, अशी अजित पवारांच्या गटाची खेळी होती.मात्र शरद पवार वायबी सेंटर येथे दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडे माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत? अशी विचारणा केली.