मुरगूड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी गजानन सरगर यांची नियुक्ती

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी गजानन सरगर यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. येथील मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची कोकण विभागात बदली झाली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक सरगर यांच्याकडे येथील ठाण्याचा कार्यभार सुपूर्द केला व निरोप घेतला.
यावेळी पोलीस इन्स्पेक्टर कुमार ढेरे यांच्यासह मुरगुड पोलीस ठाण्याचा सर्व कर्मचारी वर्ग, पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते. मुळचे सांगलीतील रहिवाशी असणारे गजानन सरगर यांनी पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस निरीक्षक पदापर्यंतचा सर्व कार्यभार नागपूर- मुंबईसारख्या राज्याच्या राजधानी व उपराजधानीत पार केला.
ग्रामीण भागात प्रथमच त्यांना मुरगुड शहरासह कागल तालुक्यातील ५३ गावांचे कार्यक्षेत्र असण्या मुरगूड पोलीस ठाण्याचा कार्यभार मिळाला आहे. १९९२ साली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेल्या सरगर यांना एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून २००५ साली नागपूर शहरात विशेष सुरक्षा विभागाकडे अधिकारीपदी नियुक्ती झाली. मुंबई शहरांमध्ये ५ वर्षे, वाहतूक शाखेकडे ३ वर्ष आरे पोलीस ठाण्याकडे, ३ वर्षे कांदिवली पोलीस ठाण्याकडे सेवा बजावली.
२०१० साली जोगेश्वरी आंबोली या ठिकाणी कार्यभार घेतला. सीआयडी विशेष शाखा क्रमांक १ यामध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांची कोल्हापूर विभागात बदली होऊन मुरगुडचा कार्यभार त्यांना देण्यात आला आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कागल तालुक्यातील मुरगुडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून अनेक कठीण प्रसंगांवर कार्यकाळात मात केली याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.