पृथ्वीराज मगदूम ‘कुमार महाराष्ट्र केसरीचा’ मानकरी

शाहूवाडी तालुक्यातील साळशीचा उद्योन्मुख मल्ल पृथ्वीराज मगदूम पहिल्या कुमार महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. त्याने पुण्याच्या यजमान मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचा पै. धीरज कारंडे याच्यावर १० गुणांनी एकतर्फी मात केली. १७ वर्षाखालील खुल्या कुमार गटात झालेल्या ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात त्याने हे लक्ख यश मिळवले. स्पर्धा आयोजकांनी पै. पृथ्वीराजला विजेतेपदाची चांदीची गदा आणि एक लाखाची दुचाकी देऊन गौरविले. पृथ्वीराज हा गणपतराव आंदळकर यांचे शिष्य व महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल राजाराम मगदूम यांचा सुपुत्र आहे. पृथ्वीराजचे साळशी या जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले.
पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात १७ वर्षाखालील खुल्या गटात ग्रीको रोमन प्रकारातील पहिली कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीच्या लढतीत पुण्याच्या पै. धीरज कारंडे याचा कोल्हापूरचा धिप्पाड शरीरयष्टी आणि उंचापुरा पै. पृथ्वीराज मगदूम याच्यापुढे निभाव लागला नाही. त्याला पृथ्वीराजने १० गुणांनी लिलया पराभूत केले. पृथ्वीराजने याआधीही उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजनी गटात ब्राँझ पदक मिळविले आहे. कुमार महाराष्ट्र केसरी किताबानंतर महाराष्ट्र केसरी (वरिष्ठ) सह हिंद केसरीचा किताब मिळविण्याचे ध्येय असल्याचे पै. पृथ्वीराज याने सांगितले.
दरम्यान, राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष मंगेश गोंधळेकर, आ. भीमराव तापकीर, आ. रवींद्र धंगेकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त पै. काका पवार या मान्यवरांच्या हस्ते पै. पृथ्वीराजला चांदीची गदा आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सद्या तो बेळगाव येथील मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटच्या कुस्ती केंद्रात एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याला रणजीत महाडिक, रामचंद्र साळुंखे, चुलते शिवाजी मगदूम, सर्जेराव मगदूम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.