1 लाखाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीकडून अटक

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात साक्षीदाराला आरोपी न करण्यासाठी आणि पूर्वी बाकी राहिलेली रक्कम असे एकूण एक लाख रुपये लाच स्वीकारताना जन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) केली आहे. अशफाक मुस्ताक शेख (वय 37) असे एसीबीच्या पथकाने अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत 39 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे. जीन्सी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात साक्षीदार याला आरोपी न करण्यासाठी शेख याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता शेख याने तक्रारदार यांच्याकडे 19 मे आणि 12 जुलै रोजी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तडजोडी अंती ठरलेली 30 हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी तक्रारदार शेख याच्याकडे गेले. त्यावेळी या गुन्ह्यातील पूर्वी अटक केलेल्या आरोपीकडे 3 लाख रूपयांमधील बाकी राहिलेले एक लाख दहा हजार रुपयांची परस्पर लाचेची मागणी केली. यामध्ये तडजोड करुन 70 हजार रुपये असे दोन्ही मिळून एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना अशफाक शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेख याच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस अंमलदार सिनकर, वाघ, नागरगोजे, चंद्रकांत शिंदे,चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.