मुरगूड ची महिला कुस्तीपटू स्वाती शिंदेला शिवछत्रपती पुरस्कार

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड स्वाती शिंदे हीला महाराष्ट्र सरकारचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.आंतरराष्ट्रीय किर्तीचे तिचे प्रशिक्षक दादासो लवटे यांनी सांगितले की स्वातीला. आतापर्यंत मिळालेल्या पारितोषिकात हा सर्व श्रेष्ठ पुरस्कार आहे.
त्यामुळे मुरगूड नगरीचे आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती संकुलाचे नाव महाराष्ट्र व देशातही झळकले आहे.
तिने आपला हा मानाचा छत्रपती पुरस्कार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीला तसेच आई वडील व गुरूंना अर्पण केला आहे. आजवर तिने ४४ किलो ते ५३किलो वजन गटात प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांकांची मिळून २० हून अधिक पदके मिळवली आहेत.
त्यामध्ये १९ वर्षा खालील ग्रामीण कुस्ती स्पर्धापासून ते ज्युनिअर ,सिनियर महिला कुस्ती स्पर्धा, विद्यापिठ पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धा यांचा समावेश आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने उज्वल यश संपादन केले आहे.
सन १९९८ मध्ये जन्म झालेल्या स्वातीने नुकतीच पंचविशी गाठली आहे. तिचे आई वडील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून शेती बरोबर दुग्ध व्यवसायदेखील करतात.
लोकनेते सदाशिवराव मंडलिक क्रीडा संकुलात ती तयार झाली.तिचे प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.खासदार संजय मंडलिक,वस्ताद सुखदेव येरुडकर,इत्यादी अनेकांचे तिला नेहमीच प्रोत्साहन मिळत राहिले.शिवराज विद्यालयात तिने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठात तिने उच्च शिक्षण घेतले.
मुरगूड नगरपरिषद व सर्व पदाधिकारी यांनीही तिला मोलाचे सहकार्य केले आहे.याशिवाय राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती प्रशिक्षकांनी तिच्या या यशात मोलाचे योगदान दिले आहे.